सिमेंटची मागणी 640 दशलक्ष टनावर जाणार

नवी दिल्ली – भारतातील बांधकाम आणि पायाभूत क्षेत्र वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक वर्ष 2030 पर्यंत सिमेंटची मागणी 640 दशलक्ष टन प्रतिवर्ष या पातळीवर जाण्याची शक्यता आदित्य बिर्ला उद्योग समूहातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने व्यक्त केली आहे.
भारतातील सिमेंट मागणीच्या विविध अहवालातील मूल्यांकनाचा हवाला देऊन या कंपनीने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2024 ते आर्थिक वर्ष 2030 या कालावधीमध्ये सिमेंटची मागणी दर वर्षाला सात ते आठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षात सिमेंटची मागणी 424 दशलक्ष टन प्रति वर्ष या पातळीवर होती. या कंपनीने आपली देश- विदेशातील उत्पादन क्षमता वाढवून सध्या 182.8 दशलक्ष टन प्रति वर्ष या पातळीवर केली आहे. 2026 आणि 2027 या वर्षात ही क्षमता आणखी 26.5 दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी वाढविण्यात येणार आहे.
या कंपनीची देशात 82 उत्पादन केंद्र आहेत. आता अदानी उद्योग समूह अंबुजा सिमेंट आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून सिमेंट उत्पादन क्षेत्रात उतरला आहे. सध्या अदानी समूहाची उत्पादन क्षमता अल्ट्राटेक सिमेंटनंतर दुसर्या क्रमांकावर आहे.
कंपनी इमारतीबाबत आणि बांधकामाबाबत विकसकांना 4,432 केंद्रातून सल्ला पुरवत आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने 1,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करून वायर आणि केबल क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाणार असून या प्रकल्पाची क्षमता 35 ते 40 लाख किलोमीटर केबल तयार करण्याची असणार आहे.


