Nagar : फुल उत्पादक शेतकरी व व्यवसायिकांसाठी आनंदोत्सव

शिर्डी : कोरोनाकाळापासुन शिर्डी परिसरातील फुलशेती आर्थिक संकटाचा सामना करित होती. फुल उत्पादक शेतक-यांना वाचवण्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा . डॉ .सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातूनच साईं समाधीवर भाविकांना पूर्ववत फुले वाहाण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिर्डी परिसरातील फुलशेतीला पुन्हा चांगले दिवस येणार असून या निर्णयामुळे शिर्डीतील बाजारपेठ फुलून जाणार असण्याची भावना शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी व्यक्त केली.
साईबाबांचे अंतरराष्ट्रीय देवस्थान असल्याने शिर्डी आणी परिसरात शेकडो एकरांवर शेतक-यांनी विविध फुलांची शेती फुलवली होती . त्यातून फुलउत्पादक शेतक-यांना व हार – फुल व प्रसाद विक्रीतून शिर्डीतील व्यवसायिकांना चांगला फ़ायदा होत होता . कोरोना काळात साईमंदीरात फुले वाहाण्यास बंदी घातली गेली आणी कोरोना संपल्यावरही ही बंदी क़ायम राहील्याने फुल शेती करणारे शेतकरी व शिर्डीतील व्यवसायिक आर्थिक संकटात सापडला होते.
तत्कालीन महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फुल उत्पादक शेतकरी व शिर्डीतील व्यवसायिक यांच्या हीतासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमीटी स्थापन करून या भागातील फुल उत्पादक शेतकरी व फुल शेती वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला तसेच डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील व्यावसायिकांची फुल ,हार, प्रसाद सुरू करण्याबाबत मागणीचा विचार करत या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी न्यायालयीन लढा उभा करण्यासाठी फुल उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ दिले.
बाजारभावाप्रमाणे फुले शिर्डीच्या फुलबाजारातून विकत घेवून साईसंस्थान क्रेडिट सोसायटीच्या मार्फत भाविकांना देण्याचा निर्णय स्वागताहर्य असुन या निर्णयामुळे भाविकांची फसवणुक थांबणार आहे व फुल उत्पादक शेतक-यांनाही चांगला भाव मिळण्यास मदत होणार असून या निर्णयामुळे शिर्डीतील अर्थकारणाला गती मिळणार असून गुरुवारी साई मंदिरात फुल- हार,प्रसाद नेण्यास सुरुवात झाल्याने या निर्णयाचे अभय शेळके यांनी शिर्डीतील व्यवसायिक तसेच फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने ना. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहे.





