Meera Ambedkar: बौद्ध महिला परिषदेत स्त्रीशक्तीचा जागर; मीरा आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार
Meera Ambedkar: परिषदेच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विमल थोरात उपस्थित

पिंपरी – बौद्ध धम्मातील प्रज्ञा, करुणा, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत स्त्रीशक्ती, महिला नेतृत्व, ऐतिहासिक योगदान आणि मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांवर चिंचवड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेत मंथन करण्यात आले. देश-विदेशांतील भिक्खुनी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्या आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांच्या सहभागाने पार पडलेल्या या परिषदेला सुमारे एक हजार उपासक-उपासिका उपस्थित होते.
विस्डम इन मोशन, कॅटलिस्ट फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १७) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे आणि लक्ष्मीकांता माने यांनी परिषदेच्या आयोजनात पुढाकार घेतला.
परिषदेच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विमल थोरात यांनी बुद्ध आणि आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी नव्या पिढीने, विशेषतः जेन झी तरुणाईने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची आणि महाराष्ट्रात स्वतंत्र पाली विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली.
प्रा. मनोरी पी. सेनानायके यांनी ‘बौद्ध मूल्ये : सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. भिक्खुनी महाकासा यांनी कोरियन भिक्खुनी संघाची जागतिक स्तरावरील भूमिका, तर भिक्खुनी विसुद्धिपन्ना यांनी युद्धातून शांततेकडे वाटचाल करण्यात व्हिएतनामी भिक्खुनींचे योगदान मांडले. डॉ. रुपाली भामरे मून यांनी परदेशातील आंबेडकरी विचारांचा प्रसार, तर डॉ. योजना भगत यांनी शिलालेखांच्या आधारे बौद्ध महिलांचा ऐतिहासिक प्रवास उलगडला.
मानसिक स्वास्थ्याच्या सत्रात डॉ. नीलम ओसवाल यांनी धम्माच्या तत्त्वज्ञानातून ताण आणि चिंता यांवर मात करण्याविषयी मार्गदर्शन केले. अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी आपला आंबेडकरवादी विचारांकडे झालेला प्रवास कथन केला. ‘जेन झींच्या काळात जयभीम २.०’ या चर्चासत्रात तरुणाई आणि आंबेडकरी विचार यांच्यातील नात्यावर चर्चा झाली.
मार्गदर्शित ध्यानाने परिषदेची सांगता झाली. या परिषदेत अॅड. रंजना भोसले, वैशाली शेलार आणि डॉ. मनीषा कर्णे यांना ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मीरा आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या योगदानाचा सन्मान आणि बौद्ध मूल्यांच्या प्रसाराचा संदेश या परिषदेतून देण्यात आला.





