पिंपरी | नियमांचे पालन करून सण साजरे करा

खालापूर, (वार्ताहर) – आगामी काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव यांसह सर्वच धार्मिक सण कायदा सुव्यवस्था राखून गुण्यागोविंदाने साजरे करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बुधवारी खोपोली पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय प्रमुख, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. यासह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढला होता.
खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत सदर बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत,
सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, उपपोलीस निरीक्षक अभिजीत व्हारांबळे, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,
माजी नगरसेवक मोहन औसरमल, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र रोकडे, मोईन खान, आशपाक लोगडे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरूनाथ साठेलकर, भाजपाचे सनी यादव,
राहुल जाधव, हेमंत नांदे, शिळफाटा ग्रामस्थ मंडळाचे राजेंद्र फक्के, विश्व हिंदू परिषदेचे अविनाश मोरे, काँग्रेसचे सागर जाधव आदी उपस्थित होते.
सोशल मीडियावर असणार नजर –
धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे, जातीय सलोख्यास हानी पोहचविणारे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचविणारे, एखाद्या विशिष्ट समाजाला भडकविणारे पोस्ट, संदेश सोशल मीडियावर पोस्ट करू नका.
कोणत्याही घटनेची संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय, सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय सोशल मीडियावर विचार व्यक्त करू नका. समाजामध्ये अफवा पसरू नये किंवा अफवावर विश्वास देखिल ठेवू नये.
कोणत्याही धर्माच्या, व्यक्तिच्या व्यक्तिगत किंवा सार्वजनिक भावना दुखावतील अशा प्रकारे स्टेटस किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये किंवा व्हायरल करू नये. आगामी काळामध्ये सर्वधर्मीय सण उत्सव साजरा केले जाणार आहेत.
सदर सण शांततेत साजरे करण्यात यावेत, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आगामी काळामध्ये खोपोली पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत सर्वांनीच योग्य ती खबरदारी घ्यावी, याबाबत योग्य त्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.





