पुणे जिल्हा | शिक्षणाची संधी देणाऱ्या सावित्रीबाईंची जयंती साजरी करा

बेलसर, (वार्ताहर)- सावित्रीबाईंची जयंती सर्वांनी साजरी करायला पाहिजे. पण आम्ही महिला मार्गशीर्ष महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत करतो. ती पुस्तक छापणारा व्यक्ती कोट्यधीश झाला, पण महिलांची परिस्थिती बदलली नाही. आपल्याला ज्या सावित्रीबाईने शिक्षणाची संधी उपलब्ध केली.
सन्मानाने जगायला शिकविले, त्यांची जयंती साजरी केली पाहिजे, असे मत जयश्री नलगे यांनी केले. महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) संस्थेच्या वतीने खानवडी (ता. पुरंदर) गावात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून ४५० महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकारी फातिमाबी शेख आणि त्यांची विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित ‘सत्यशोध’ हे नाटक सादर करण्यात आले. बाईला माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण किती गरजेचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला.
यावेळी खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, ग्रामपंचायत सदस्या उषा धिवार, सत्यशोध नाटकातील कलाकार शितल यशोधरा, शर्मिला जोशी, प्रज्ञा गवळी, बेलसर गावच्या माजी सरपंच वनिता जगताप, मासुमच्या तालुका सह-संयोजक मीना शेंडकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात जोतिबा आणि सावित्री यांना नमन करणाऱ्या गीताने झाली. सुनंदा खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पितृसत्तेला टक्का देऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्या मोनाली म्हेत्रे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच वनिता जगताप आणि उदाचीवाडीच्या नंदा कुंभारकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन वैशाली कुंभारकर यांनी केले. माया गुरव यांनी स्वागत केले. मंगल कुंजीर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मासुम संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.





