“युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच राहणार, अफवांकडे लक्ष देऊ नका”; भारतीय लष्कराचे आवाहन

India-Pakistan | भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी संपणार असल्याच्या बातम्या काही समाज माध्यांतून समोर येत आहे. याबाबत स्वत: भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या.
याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या डिजीएमओंची कोणतीही नियोजित चर्चा आज होणार नाही. 12 मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी शर्थी या ठरवण्यात आलेल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या डिजीएमओंची शेवटची चर्चा होती. त्यावेळी युद्धविरामाला कोणतीही मुदत ठरवण्यात आलेली नव्हती. युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच आहे. त्यामुळे आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, अफवांकडे लक्ष देऊ नका,” असे आवाहनही भारतीय लष्कराकडून करण्यात आले आहे. India-Pakistan |
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तान सातत्याने भारतीय शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत होता, ज्याला भारतीय सैन्यही चोख प्रत्युत्तर देत होते. 10 मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करारावर स्वाक्षरी झाली.
त्यानंतर 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये बैठक झाली, ज्यामध्ये युद्धबंदीबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. तर भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईबाबत भविष्यात कोणतीही दहशतवादी घटना झाल्यास भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल, असा कडक संदेश दिला. India-Pakistan |
हेही वाचा:





