‘शस्त्र आणि शास्त्र दोन्ही महत्त्वाचे’, ऑपरेशन सिंदूरबाबत CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे वक्तव्य

CDS Anil Chauhan on Operation Sindoor: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरू असून, भारतीय सैन्याला २४ तास आणि वर्षभर सतर्क राहावे लागेल. युद्धात शस्त्रांबरोबरच शास्त्र म्हणजेच ज्ञानालाही तितकेच महत्त्व आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. जनरल चौहान यांनी स्पष्ट केले की, आजचे युद्ध हे पारंपरिक आणि आधुनिक तंत्रांचा समन्वय आहे. यात कायनेटिक (शस्त्राधारित) आणि नॉन-कायनेटिक (माहिती आधारित) रणनीतींचा समावेश होतो. “हे युद्ध पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या युद्धतंत्रांचा संगम आहे,” असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर: संसदेत माहिती –
केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले की, २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, हे ऑपरेशन दहशतवाद्यांचे पायाभूत ढाचे उद्ध्वस्त करण्यावर आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यावर केंद्रित होते. भारताची ही कारवाई सुस्पष्ट, मोजमापाची आणि उकसवणूक टाळणारी होती.
आंतरराष्ट्रीय दबावाचा प्रश्न –
ऑपरेशन सिंदूर आंतरराष्ट्रीय दबावाखाली सुरू झाले का, असा प्रश्न विचारला असता, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही कारवाई भारताची स्वयंस्फूर्त आणि ठोस प्रतिक्रिया होती. पाकिस्तानने भारतीय नागरी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने सर्व मोठे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले.
पाकिस्तानला मोठा फटका –
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांचे ९ ठिकाणे उद्ध्वस्त केली आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानच्या हवाई तळांवर आणि लष्करी ठिकाणांवरही भारताने हल्ले केले, विशेषत: जेव्हा पाकिस्तानने भारतीय ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला.
१० मे रोजी युद्धविराम –
चार दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रत्युत्तरानंतर, १० मे रोजी पाकिस्तानच्या सैन्य संचालन महानिदेशकाने भारतीय समकक्षाशी संपर्क साधला आणि युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला. याच दिवशी दोन्ही देशांमध्ये संघर्षविरामावर सहमती झाली.
सतर्कतेचे आवाहन –
जनरल चौहान यांनी सैन्याला २४ तास सतर्क राहण्याचे आणि शस्त्रांसह ज्ञानाचा उपयोग करून युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. “आधुनिक युद्धात शस्त्र आणि शास्त्र दोन्ही महत्त्वाचे आहेत. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, त्यामुळे सैन्याला सतत तयार राहावे लागेल,” असे त्यांनी नमूद केले.





