Pune : घटनेचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती; डीसीपी स्मार्तना पाटील यांना सांगितला घटनाक्रम….

पुणे: शहरातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याच्या घटनेने पुणे शहरासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी हा जामिनीवर सुटलेला असून त्याच्या शोधसाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेबद्दल डीसीपी स्मार्तना पाटील यांनी माहिती दिली.
पीडित तरुणी ही पुण्यात कामाला आहे. ती फलटणला गावाला जात होती. गावी जाण्यासाठी जिथे बस सुटतात तिथे ती बसली होती. तेव्हा आरोपी तिच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे. काही वेळाने आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिची विचारपूस करु लागला. आरोपीने तिला कुठं जायचं असं विचारलं. तेव्हा तिने फलटणला जातेय, असे सांगितले. त्याने सातारला जाणारी बस येथे लागत नाही असं सांगून तिला दुसरीकडे नेले, अशी माहिती पुणे पोलीस डिसीपी स्मार्थना पाटील यांनी दिली. अत्याचाराचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून त्यावरुन आरोपीची निश्चिती करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तरुणीने विश्वास ठेवला अन्..
पीडित तरुणीनेदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली. मात्र त्याने दाखवलेल्या बसमध्ये आंधार पाहून तिने प्रश्न उपस्थित केला. तेव्हा त्याने ही रात्रीची बस असून आतमध्ये प्रवासी झोपलेले आहेत त्यामुळे अंधार आहे, असे सांगून तिला विश्वास दिला. त्यानंतर ती बसमध्ये गेली तेव्हा त्याने तिला आत ढकलून बसचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
आरोपीच्या शोधार्थ टीम रवाना
अतिप्रसंगाची घटना घडल्यानंतर पीडित तरुणी तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये जावून बसली. तेव्हा रस्त्यात असताना तिने तिच्या मित्राला या घटनेबद्दल सांगितले. तेव्हा त्याने तिला पोलिसांत तक्रार दाखल कर, असा सल्ला दिला. तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी जामिनावर सुटलेला असून शिरूर गावातील रहिवाशी आहे. सीसीटीव्हीत आरोपी दिसत असून त्याला शोधण्यासाठी 8 टिम रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





