सुशांत-दिशा आत्महत्या संबंधित असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची न्यायालयीन देखरेखीखाली करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणात काही माहिती असेल, तर त्यांनी थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
याचिकाकर्ते, दिल्लीचे वकील पुनीत कौर धांडा यांच्याकडे अशी याचिका दाखल करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. उलट, तुम्ही दिशाचे कोण?, असा प्रतिप्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला. दिशा सालियनच्या मृत्यूबाबत काही घातपाताची शक्यता वाटल्यास तिचे कुटुंब यासंबंधी कायदेशीर पावले उचलेल, असे म्हणत याचिकाकर्त्याला फटकारले आहे.
मुंबई पोलिसांनी दिशा प्रकरणात कोणालाही काहीही सांगायचे असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे जाहीरपणे म्हटल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला. त्यामुळे मुंबई पोलिसांशी याबाबत काहीच चर्चा न करता कोर्टाचा दरवाजा ठोठावल्याने सदर याचिका फेटाळण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी वकील पुनीत कौर धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सुशांत आणि दिशा यांच्या आत्महत्याचे एकमेकांशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत, याचिका फेटाळून लावली होती.





