Teachers’ recruitment scam : उत्तर बंगाल विद्यापीठाच्या कुलगुरूंना अटक, सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील 2016 मध्ये सहायक शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी उत्तर बंगाल विद्यापीठाचे कुलगुरू सुबिरेस भट्टाचार्य यांना अटक केली. (CBI Arrests North Bengal University VC Subires Bhattacharyya In Teachers’ Recruitment Scam) पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष भट्टाचार्य यांना कोलकाता येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने तपास हाती घेतला आहे. भट्टाचार्य हे 2014-18 पासून आयोगाचे अध्यक्ष होते.
आयोगाने 2016 मध्ये घेतलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये इयत्ता 9 आणि 10च्या सहायक शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये आयोगाचे तत्कालीन सल्लागार एस. पी. सिन्हा आणि इतरांनी अपात्र, गैर-सूचीबद्ध आणि खालच्या श्रेणीतील उमेदवारांना फायदा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयकडून यावर्षी 7 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.





