इच्छुकां’कडून सावध हालचाली ! प्रभाग रचनेची तयारी; निवडणूक मुहुर्ताबाबत संभ्रम कायम

हडपसर, दि. 23 (विवेकानंद काटमोरे ) -राज्य शासनाने महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा अधिकार आपल्याकडे घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम स्थगित झाला होता. आता राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी (दि.22) महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचनेचा प्रारूप तातडीने बनविण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा प्रभाग रचनेचा दुसरा अंक सुरू झाला आहे. यामुळे “इच्छूकां’मध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. परंतु, प्रभाग नेमका कितीचा होणार, निवडणूक कधी होणार याबाबत अद्याप निर्णय जाहीर होत नसल्याने सावध हालचाली सुरू आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीपासून सदस्य संख्या निश्चिती आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिकांच्या निवडणुकांना मुहूर्तच मिळालेला नाही. यापूर्वी निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत या भूमिकेवर महाविकास आघाडी ठाम राहिली. राज्य शासनाने कायदा करून प्रभाग रचनेचा अधिकार आपल्याकडे घेतला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मात्र निवडणूक आयोगाला कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश दिले. पुढे प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवून ती अंतिम केली होती. आरक्षणाची सोडत काढून आरक्षणही अंतिम केले होते.
मात्र, राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. यामुळे आता प्रभाग रचना कार्यक्रमाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या “इच्छुकां’ंमध्ये यामुळे पुन्हा एकदा उत्साह आहे. निवडणुकीची आशादायक बातमी आली तरीसुद्धा “इच्छुका’ंमध्ये उत्साह संचारत आहे. यावरून निवडणुकीची उत्सुकता स्पष्ट होत आहे. कार्यकर्त्यातील उत्साह टिकवण्यासाठी निवडणुकांची भूमिका महत्त्वाची असते. परंतु, निवडणुकांचा घोळ संपता-संपेना. “इच्छूकां’मधील उत्साहसुद्धा कमी-अधिक होत आहे. आता, पुन्हा प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू झाल्याने “इच्छुकां’मध्ये उत्साह असला तरी निवडणुकीची तारीख समजल्याशिवाय तयारीबाबत उमेदवार सावध भूमिका घेत आहेत.



