पिंपरी | उघड्यावरील कचऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर गुरांचा वावर

खालापूर, (वार्ताहर) – खालापुर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कलोते ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे येथे मोकाट गुरांचा वाढलेला वावर अपघाताला निमंत्रण देत आहे.
या बाबत महामार्ग पोलीस पळस्पे केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांनी ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे.
कलोते ग्रामपंचायतीची मुंबई- पुणे महामार्ग लगत असलेल्या कालव्याला खेटून गावठाण जागा आहे. या जागेत डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यात आले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल, ढाबे, फार्म हाऊस तसेच नागरी वस्तीतील कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो.
कचऱ्याचे कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण न करता कचरा उघड्यावर टाकण्यात येतो. प्लास्टिक पिशव्या, खराब अन्नपदार्थ, सडलेला भाजीपाला याशिवाय विविध प्रकारचा कचरा जमा होत असल्याने गुरे-ढोरे, श्वान येथे मोठ्या संख्येने येतात.
डम्पिंग ग्राउंडला कोणत्याही प्रकारचे संरक्षक भिंत नसल्याने गुरांचा वावर वाढल्याने अपघात नित्याचेच झाले आहेत. ४ सप्टेंबर रोजी एनएमएमटी बसचा अपघात या ठिकाणी घडला होता. तीन गुरांना धडक दिल्यानंतर सुदैवाने बस चालकाने बस नियंत्रित केल्याने प्रवाशांचा जीव वाचला होता.
या घटनेनंतर कलोते ग्रामपंचायतीने कचरा विल्हेवाट योग्य रितीने लावण्यासाठी महामार्ग पोलीस पळस्पे यांनी नोटीस बजावली आहे. कचरा विल्हेवाटी लावण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे सूचना दिल्या आहेत.
तारेची संरक्षण जाळी लावून या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. तरी ग्रामस्थांनी सहकार्य करत, या ठिकाणी कचरा टाकू नये. – निलेश म्हसकर, ग्रामसेवक, कलोते ग्रामपंचायत





