Sonu Sood : नेपाळमध्ये महाप्रलयाचा कहर; मदतीसाठी सोनू सूद सरसावला, पोस्ट करत म्हणाला…
Sonu Sood : या कठीण काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नेपाळच्या लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे.

Sonu Sood : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुराने मोठा विंध्वस झाला आहे. महापुराच्या रौद्ररुपाने खळबळ उडाली असून सोशल मीडियावर या महापुराचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत सुमारे १६० जणांचा मृत्यू झाला असून ७५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळ लष्करातर्फे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. १५ हेलिकॉप्टर्सच्या मदतीने आत्तापर्यंत २५० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नेपाळकडून सर्वेत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत. या कठीण काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नेपाळच्या लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे.
अभिनेता सोनू सुदने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून पूरग्रस्तांना प्रोत्साहन दिले आहे. “नेपाळ, या कठीण काळात तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही अन्न, निवारा आणि तुम्हाला पुन्हा उभारणीसाठी मदत करण्याच्या आशेसह लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत.” असे पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, या पोस्टमध्ये तिने लोकांना या पूरस्थितीत नेपाळसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या काय परिस्थिती आहे?
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात महापुराचे नैसर्गिक संकट निर्माण झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, बेपत्ता लोकांची संख्या ४६३ वर पोहोचली आहे. या आपत्तीत बेपत्ता झालेल्यांमध्ये १३३ भारतीय, ५२ परदेशी आणि १३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय कैलास यात्रेवर असलेले ३१ यात्रेकरू अजूनही बेपत्ता आहेत, त्यापैकी २६ परदेशी नागरिक आहेत. सध्या या यात्रेकरूंच्या राष्ट्रीयत्वाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यांचा शोध सुरू आहे
प्रभावित कुटुंबांसाठी प्रार्थना
पुरामुळे अनेक भागांमधील वाहतूक आणि संपर्क यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ३६ पूल आणि ४५ झुलते पूल वाहून गेले असून, त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. या दुर्घटनेत १३ जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले असून, अनेक वाहनेही पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली आहेत. सोशल मीडियावर अनेक जण प्रभावित कुटुंबांसाठी प्रार्थना करत आहेत. बेपत्ता असलेले नागरिक सुखरूप सापडावेत, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






