दंडात्मक कारवाईचा भरणा मात्र थंडात्मक ! पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून न्यायालयात खटले दाखल

7 महिन्यांत 9 लाख 96 हजार 822 चालकांवर कारवाई
40 कोटी 61 लाख 34 हजार 900 रुपये दंडाची रक्कम येणे बाकी
7 लाख 23 हजार 907 चालकांनी दंड भरलाच नाही
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 19 -शहरात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर नियमित दंडात्मक कारवाई पोलीस करीत आहेत. 1 जानेवारी ते 7 ऑगस्ट दरम्यान 9 लाख 96 हजार 822 वाहन चालकांवर एकूण दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, 7 लाख 23 हजार 907 वाहनधारकांनी अद्याप त्यांच्या दंडाची रक्कम भरली नसल्याने 40 कोटी 61 लाख 34 हजार 900 रुपयांच्या दंडाची रक्कम अद्यापही सरकारी तिजोरीत जमा झालेली नाही.
शहरात लावलेले सीसीटीव्ही, वाहतूक पोलिसांकडे असलेले डिव्हाइस आणि टोईंग या माध्यमातून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. मात्र, अनेकदा दंडात्मक कारवाई केल्यानंतर चालक त्यांना आकारण्यात आलेला दंड भरत नाहीत. यामुळे आपोआपच हे प्रकरण न्यायालयाकडे वर्ग होते. गेल्या 7 महिन्यांत दंड न भरणाऱ्या 49 हजार 586 वाहनधारकांविरोधात खटले प्रलंबित आहेत. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगपुढे वाहन उभे राहणे, हेल्मेट नसणे, वाहनाची कागदपत्रे नसणे, नो पार्किंग यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 500 ते 800 रुपयांपर्यंतच्या दंडाची आकारणी पुणे वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. तर, ज्या वाहनचालकांनी दंड अद्यापही भरलेला नाही, त्यांना आता न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.
दंड भरण्यासाठी मुदत 15 दिवसांची…
वाहनधारकाने कोणत्या वाहतूक नियमाचे उल्लंघन केले आहे. यासह त्याचा फोटोही असतो, त्यामुळे साधारण 15 दिवसांत हा दंड भरणे गरजेचे असते. रोख अथवा ऑनलाइन पद्धतीने देखील दंड भरता येतो.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू असते. अनेक वाहनचालक दंड वेळेत भरत नाहीत. यामुळे प्रकरण पुढे न्यायालयाकडे पाठवावे लागते. दंड 15 दिवसांत भरणे गरजेचे असते. मुळात वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही.
– राहुल श्रीरामे,
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा





