संदेशखाली प्रकरण: मुख्य आरोपीला अटक न होणे आश्चर्यकारक; कलकत्ता उच्च न्यायालयाची टिप्पणी

कोलकता – संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपीला आतापर्यंत अटक न होण्याची बाब आश्चर्यकारक आहे, अशी टिप्पणी कलकत्ता उच्च न्यायालयाने केली. पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस सरकार आणि पोलिसांना धारेवर धरणारी टिप्पणी म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
तृणमूलचा नेता शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांनी बंगालच्या संदेशखालीमधील अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा शेख अद्यापही फरार आहे. त्यावरून राजकारण आणखीच तापले आहे.
अशात विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना संदेशखालीला भेट देण्यापासून रोखण्यात आले. त्यांना उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने संदेशखालीला जाण्याची परवानगी दिली. त्या निर्णयाला बंगाल सरकारने न्यायालयाच्या खंडपीठात आव्हान दिले.
मात्र, खंडपीठाने निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवत बंगाल सरकार आणि पोलिसांना फटकारले. रेशन घोटाळ्यावरून शेख ईडीच्या रडारवर आहे.
मागील महिन्यात ईडीचे पथक त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यासाठी गेले. त्यावेळी जमावाने त्या पथकावर हल्ला केला होता. तेव्हापासून शेख फरार आहे. आता त्याच्याशी संबंधित संदेशखाली प्रकरण पुढे आले आहे.





