Newasa News : जळके खुर्दमध्ये पाकिस्तान आर्मीच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने गुन्हा दाखल

नेवासा : अहिल्यानगर जिल्ह्यातील जळके खुर्द (ता. नेवासा) येथील एका युवकाने पाकिस्तान आर्मीच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटसवर तेरा सेकंदांची रिल्स ठेवल्याने पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार (२२ सप्टेंबर) रोजी गोपनिय शाखेचे पोलीस हवालदार अरविंद वैद्य यांच्या फिर्यादीवरून रसुल उर्फ गबु यासीन पठाण (रा. जळके खुर्द) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १९२, १३५३(१), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या कृत्याने देशाविरुद्ध अपराध आणि सार्वजनिक शांततेला धक्का बसण्याची शक्यता असल्याचे पोलीस सांगतात.
जळके खुर्द येथील या मुस्लिम युवकाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ रिल्स स्टेटसवर शेअर केली होती. या १३ सेकंदांच्या क्लिपमध्ये एक महिला दिसत असून, तिने पांढरा टी-शर्ट घातला आहे. यावर हिरव्या रंगात ‘पाकिस्तान’ असा इंग्रजी मजकूर आणि पाकिस्तानी झेंडा आहे. तिच्या खांद्यावर हिरवा दुपटा, चेहऱ्यावर काळा मास्क आणि कपाळावर उर्दू भाषेतील पांढरी पट्टी असा पेहराव आहे.
पार्श्वभूमीत पाकिस्तान आर्मीच्या गाण्याचे ‘ये दुश्मन आगे बढ़ तो सही, तेरा नाम निशाना मिटा देंगे, हम पाकिस्तानी फौजी हे, तेरी इट से इट बजा देंगे’ हे बोल ऐकू येतात. हे स्टेटस सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने भयग्रस्त वातावरण निर्माण झाल्याचा आरोप आहे.
गोपनिय शाखेच्या सूत्रांकडून या स्टेटसचे स्क्रीनशॉट मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात तात्काळ कारवाई करण्यात आली. वैद्य यांच्या माहितीदाराने ही बाब उघड केली असता, युवकाविरुद्ध देशद्रोह आणि सामाजिक तणाव वाढवण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलीस सध्या तपास करत असून, अशा राष्ट्रविरोधी कृत्यांवर कडक नजर ठेवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संभ्रम आणि चर्चेला उधाण आले असून, सोशल मीडियावरील जबाबदारीबद्दल जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.





