मुंबई – शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध आकाशवाणी आमदार निवास कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. शिळं अन्न दिल्याचा राग अनावर होऊन गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५२ (अपमानित करणे), ११५(२) (मारहाण), आणि ३(५) (संगनमताने मारहाण) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. समाजमाध्यमांवरील व्हिडीओ आणि स्थानिकांच्या चौकशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, याबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. काय आहे प्रकरण? गायकवाड यांनी कँटीनमध्ये मागवलेल्या वरण-भाताच्या जेवणात खराब वास येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला “विष खायला घालतो का?” असे विचारत मारहाण केली. प्लास्टिक पिशवीत पॅक केलेल्या डाळीला दुर्गंधी येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला ती वास घ्यायला लावली आणि मारहाण केली. आमदारांचे विवादास्पद वक्तव्य – “मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली. कितीही गुन्हे दाखल झाले तरी मला फरक पडत नाही,” असे गायकवाड यांनी सांगितले. याशिवाय, त्यांनी दक्षिण भारतीयांवर टीका करत “महाराष्ट्राला साऊथच्या लोकांनी नासवले, लेडीज बार आणि डान्स बारमुळे संस्कृती खराब झाली,” असे वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी पोलिस स्वतःहून चौकशी करू शकतात, असे सांगितले होते. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने गायकवाड यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गायकवाड यांच्या कृती आणि वक्तव्यांवरून विरोधकांनीही तीव्र टीका केली आहे.