Crime News : चार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ‘गॅम्बलर’वर गुन्हा दाखल; लोणीकंद पोलिसांची दमदार कामगिरी
Crime News : चार वर्षापासून पोलिसांना गुंगरा देणारा ऑनलाईन गॅम्बलर पोलिसांच्या रडारवर आल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

वाघोली : ऑनलाइन गेमद्वारे जुगार घेत असताना महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 अ शिरसवडी तालुका हवेली येथील अक्षय भानुदास गावडे वय 30 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सरकारतर्फे लोणीकंद पोलीस ठाण्यातील शिपाई मल्हारी नर्सिंग सपुरे यांनी फिर्याद दिल्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वर्षापासून पोलिसांना गुंगरा देणारा ऑनलाईन गॅम्बलर पोलिसांच्या रडारवर आल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै रोजी वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील शिवबा मोबाईल शॉपी मध्ये आरोपी अक्षय भानुदास गावडे हा त्याच्या मोबाईल मधील फन गेम नावाचे ऑनलाइन गेम द्वारे जुगार खेळणाऱ्या नागरिकांना ऍप ची लिंक व नवीन अकाउंट आयडी पासवर्ड देऊन त्यांच्याकडून बँक अकाउंट वर ऑनलाईन रक्कम स्वीकारून त्याच्या मोबदल्यात त्यांचे आयडीवर रकमेप्रमाणे गेम खेळण्यासाठी पॉईंट देऊन जुगार घेत असताना पोलिसांना मिळून आला असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपीकडून जवळपास 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांना चार वर्षापासून हुलकावणी देणारा गॅम्बलर …
2022 नंतर वाडे बोल्हाई, शिरसवडी, अष्टपुर, हिंगणगाव, उरुळी कांचन, डोंगरगाव, केसनंद आदी भागातील युवकांना ऑनलाइन गेम ची सवय लावून आर्थिक रकमेच्या परतावा देण्याच्या आमिषाने याच आरोपीने अनेक जणांची फसवणूक केली असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल पोलिसांच्या तपासात निष्पन्न होणार आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे.
अनेक लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला..
लॉकडाऊन च्या कालावधीनंतर अनेकांनी याच आरोपीकडे लाखो रुपयांची बोली लावून आर्थिक फायदा होण्याच्या हेतुने अनेकांनी आपल्या जमिनी ऑनलाइन गेम खेळण्यासाठी विकले असल्याचा प्रकार देखील चर्चेला येऊ लागला असून अनेक गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच यांना मोठा आर्थिक फटक्या बरोबर पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा आता या गुन्ह्यामुळे पणाला लागली आहे.
ऑनलाइन गेम द्वारे जुगार खेळणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सुनिता रोकडे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे





