Pune News : आंदेकर टोळीवर संघटीतरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : गणेश पेठ मच्छी मार्केट परिसरातील मासे व्यापाऱ्यांना धमकावून आणि दहशतीच्या जोरावर तब्बल १२ वर्षांपासून संघटीतरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी कुख्यात सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर व त्याच्या टोळीतील एकूण ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आंदेकरच्या घरातील एका महिलेसह इतर सदस्यांचाही समावेश आहे.
हा गुन्हा (गु.र.नं. १८२/२०२५) भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ (खंडणी), ३०८ (४) (जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी घेणे), १११ (संघटीतरीत्या गुन्हे करणे) व ३ (५) (सामाईक उद्देश) या कलमांतर्गत २० सप्टेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आंदेकर टोळीने प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली दरमहा मासे व्यापाऱ्यांकडून तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्यांना जागा मिळवून देणे व व्यवसायात सहकार्य करण्याचे आश्वासन देत टोळीने वर्षानुवर्षे धमकी व दहशतीच्या जोरावर हा गैरप्रकार सुरू ठेवला होता. परिणामी, अनेक मासे विक्रेते व व्यापारी कर्जबाजारी झाले होते, मात्र टोळीच्या दहशतीमुळे त्यांनी तक्रार देण्याचे धाडस केले नव्हते.
मात्र, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संघटीत गुन्हेगारीविरुद्ध सुरू असलेल्या आक्रमक मोहिमेमुळे नागरिकांमध्ये धाडस निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर एका व्यापाऱ्याने आंदेकर टोळीविरुद्ध धाडसाने तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, फरासखाना पोलीस करीत आहेत. पुणे पोलीसांनी स्पष्ट केले आहे की, शहरातील संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत कठोर कारवाई सुरूच राहील.




