Police Bribe : 1 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी PSI एसीबीच्या जाळ्यात; पदोन्नतीच्या दिवशीच कारवाई
Police Bribe : एका गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी तडजोडीअंती 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Police Bribe : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून नगर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
एका गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी तडजोडीअंती 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशेष म्हणजे, सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त होण्याच्या दिवशीच ही कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुका पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपीला मदत करण्यासाठी तसेच कायदेशीर प्रक्रियेत सवलत देण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे याने 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने संपूर्ण प्रकरणाची गुप्त पडताळणी केली. चौकशीत गांगुर्डे याने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने कारवाई करत त्याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, गांगुर्डे याला काही दिवसांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीनंतर पोलीस मुख्यालयात होणाऱ्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्याची कार्यमुक्ती प्रलंबित होती.
अखेर ज्या दिवशी त्याला प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात येणार होते, त्याच दिवशी लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याने पोलीस विभागात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.




