अमिताभ बच्चन यांच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल; जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप

Nikhil Nanda | बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा अडचणीत सापडले आहेत. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील दातागंज पोलिसांनी त्यांच्या आणि ट्रॅक्टर कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं आणि त्यांच्या आदेशानंतरच हा खटला दाखल करण्यात आला आहे.
एका रिपोर्टनुसार, कंपनीचे सीएमडी निखिल नंदा, फर्मचे उत्तर प्रदेश प्रमुख, क्षेत्र व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाहजहांपूर डीलर आणि इतर तीन अधिकाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्यावर ट्रॅक्टर एजन्सीचे मालक जितेंद्र सिंग यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पापड हमजापूर गावातील रहिवासी ज्ञानेंद्र यांनी ही तक्रार दाखल केली आहे, ज्यांचा भाऊ जितेंद्र सिंग दातागंजमध्ये जय किसान ट्रेडर्स नावाची ट्रॅक्टर एजन्सी चालवत होता. Nikhil Nanda |
जितेंद्रवर वारंवार दबाव
सुरुवातीला जितेंद्र त्यांचा सहकारी लल्ला बाबू यांच्यासोबत व्यवसाय सांभाळत होता. परंतु कौटुंबिक वादामुळे बाबू तुरुंगात गेल्यानंतर जितेंद्र एजन्सीचे काम सांभाळत होते. ज्ञानेंद्र यांनी आरोप केला की, नंदा यांनी कंपनीचे अधिकारी आशिष बालियान (क्षेत्र व्यवस्थापक), सुमित राघव (विक्री व्यवस्थापक), दिनेश पंत (यूपी प्रमुख), पंकज भास्कर (फायनान्सर कलेक्शन अधिकारी), अमित पंत (विक्री व्यवस्थापक), नीरज मेहरा (विक्री प्रमुख) आणि शिशांत गुप्ता (शाहजहांपूर डीलर) यांच्यासह जितेंद्रवर विक्री वाढवण्यासाठी वारंवार दबाव आणला.
या सर्वांनी विक्रीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास डीलरशिप परवाना रद्द करण्याची आणि त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची धमकी दिली होती. यामुळे जितेंद्र खूप तणावाखाली होते, असे म्हंटले जाते.
२१ नोव्हेंबर २०२४ रोजी, कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांची पुन्हा भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, २२ नोव्हेंबर रोजी, जितेंद्र यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी आता निखिल नंदा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून ते अडचणीत सापडले आहेत.
हेही वाचा :





