कॅस हजेरी, मोबाइलसक्ती रद्दतेच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांची निदर्शने

पुणे – अंगणवाडी सेविकांची हजेरी ग्राह्य धरण्यासाठी लागू केलेली कॅस मोबाइलपद्धती आणि मोबाइल वारताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी पुण्यातील महिला व बालकल्याण उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने शनिवारी (दि.5) विविध मागण्यांचे निवेदन उपायुक्तांना सादर करण्यात आले.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दैनंदिन कार्यालयीन कामकाज करण्यासाठी मोबाइल खरेदी करून दिले आहेत. मोबाइल संच दिल्यानंतर अंगणवाडी सेविकांची ऑफलाइन पद्धतीची उपस्थिती ग्राह्य धरली जात नसून कॅस मोबाइलचा वापर करून हजेरी दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विविध कार्यक्रम, सभांकरिता अंगणवाडी सेविकांना बाहेर जावे लागत असल्याने त्या दिवसाची हजेरी कशी ग्राह्य धरली जाणार? असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय आयोजित केल्या जाणारे ओटी भरण, बेटी बचाओ-बेटी पढाओ यांसारख्या कार्यक्रमांचे फोटो सीबीई, पोषण मिशन व मुख्य सेविकांच्या वैयक्तिक मोबाइल पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाइलला रेंज नसल्याने ही कामे करणे शक्य होत नाही. त्यातच मोबाइलवर व्हॉटस्अप इन्स्टॉल होत नसल्याने अंगणवाडी सेविकांना कार्यक्रमाचे फोटो पाठविण्यास अडचण येत आहे. नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनामध्ये सुनंदा साळवे, अनिता आवळे, शकुंतला घोरपडे यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.





