Satara | स्वच्छता अभियान उपक्रम वर्षभर राबवा

कोरेगाव, (प्रतिनिधी) – स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे, ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्ती दररोज आंघोळ करून आपले शरीर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपले शहर आणि परिसर स्वच्छ ठेवले तर सर्वांचेच आरोग्य चांगले आणि व्यवस्थित राहील. कोरेगाव नगरपंचायतीने हाती घेतलेला स्वच्छता अभियान उपक्रम अत्यंत चांगला आहे,
तो वर्षभर राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियान सप्ताह राबविण्यात येत आहे. शनिवारी नवीन एस. टी. बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, मुन्नाभाई काझी रशीदभाई शेख, दिलीप बर्गे, विजय घोरपडे, शिवसेनेचे शहर प्रमुख महेश बर्गे, पोपटराव भिलारे,
अजित बर्गे, कल्पेश ओसवाल, इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी सुधा मोरे, एसटीचे वाहतूक नियंत्रक राजेंद्र बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाहतूक नियंत्रक राजेंद्र बर्गे म्हणाले, राजाभाऊ बर्गे यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यकालापासून कोरेगावच्या नवीन एस.टी. बसस्थानकासाठी सर्वतोपरी मदत केली आहे. परिसरातील स्वच्छता, वृक्षारोपण मोहीम, बसस्थानक स्वच्छता आदी उपक्रमांना त्यांचा हातभार लागला आहे.
उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. नागरिकांनी स्वतःहून दिवसातून दोन वेळेस आपल्या घर परिसराची स्वच्छता करून या स्वच्छता अभियानास हातभार लावावा, असे आवाहन केले.





