नाशिकमध्ये कार- दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

नाशिक – जिल्ह्यातील नांदगाव येथे कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात घडली. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भाऊसाहेब माळी, लंकाबाई माळी (रा.नाग्या -साक्या) असे अपघातातील मयत पती-पत्नीचे नाव आहे. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात फेकली गेली आहेत. नाशिकच्या नांदगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
पिंपरखेड टोल नाका परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अपघातातील पती-पत्नीला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, पोलिसांकडून अपघाताच्या घटनेचा अधिक तपास करण्यात येत असून प्राथमिक माहितीनुसार दोन्हीही वाहने वेगात होती. त्यामुळे, अपघात एवढा भीषण झाला की दुचाकी व कारही नाल्यात जाऊन पडली. कारमधील प्रवासी गंभीर जखमी असून कारचेही अतोनात नुकसान झाले आहे. तर, दुचाकीही चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेने नांदगाव परिसरातील शोककळा पसरली आहे.





