Karad Accident : कराडजवळ कार २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन वेळा पलटी
Karad Accident : एअरबॅग उघडल्याने कारमधील पाच जण सुखरूप

यशवंतनगर : फलटणहून कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी निघालेल्या स्विफ्ट कारचा रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळ अपघात झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अंधारात एस आकाराच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या सुमारे २० फूट खोल खड्ड्यात कोसळून तीन वेळा पलटी झाली.
सुदैवाने कारच्या एअरबॅग उघडल्याने चालकासह कारमधील पाचही प्रवासी गंभीर दुर्घटनेतून सुखरूप बचावले. उत्तर कोपर्डे जवळ ( ता. कराड ही घटना घडली. स्वीफ्ट कार (एमएच ११ सीक्यू ९३८१) क फलटणहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती.
रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळील एस आकाराच्या वळणावर पहाटेच्या अंधारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेली. कार सुमारे २० फूट खाली कोसळल्यानंतर तीन वेळा पलटी झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची तीव्रता पाहता कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र, अपघाताच्या वेळी कारच्या एअरबॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. कारमधील पाचही जण सुखरूप बचावल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळील या धोकादायक वळणावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याच्या स्थितीचा अंदाज येण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
तीव्र वळणाची पूर्वसूचना देणारे दिशादर्शक फलक, सुरक्षा रेलिंग तसेच वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोठी दुर्घटना टळली
मसूर ते कराड यादरम्यान उत्तर कोपर्डे जवळ असलेल्या रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळील धोकादायक वळणावर यापूर्वीही अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पहाटेच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने स्विफ्ट कार २० फूट खड्ड्यात कोसळली.
सुदैवाने एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले. मात्र, भविष्यातील गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिशादर्शक फलक, सुरक्षा रेलिंग व गतिरोधकाची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.




