Pune News : रहेजा विस्टा सोसायटीजवळ दुचाकीला कारची धडक; डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू

पुणे : महंमदवाडी परिसरातील रहेजा विस्टा सोसायटी समोर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुण डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. या घटनेत कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव सन्नी अंबादास मिसाळ ( २७, रा. ताडीवाला रोड, पुणे) असे असून, तो सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याचा भाऊ बाबु अंबादास मिसाळ (२९) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपी अमान समीर मणीयार (२१, रा. हांडेवाडी, पुणे) याने आपल्या ताब्यातील फिएट पिंटो कार (MH 02 CL 7483) ही अतिवेगाने व बेदरकारपणे चालवून सन्नी मिसाळ यांच्या स्कुटी (MH 12 XG 0216) ला मागून जोराची धडक दिली. या धडकेत सन्नी गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम १०६, २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





