Shikrapur News : तळेगावात चालत्या कारने घेतला पेट
Shikrapur News : घटनेची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळताच पोलीस हवालदार महेंद्र पाटील, आत्माराम तळोले, शरद कारकुड, पोलीस पाटील पांडुरंग नरके, आपदा मित्र गणेश टिळेकर, शेरखान शेख, श्रीकांत भाडळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मुळोबा मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या इसमाच्या चालत्या अचानकपणे कारने पेट घेऊन कारला लागलेल्या आगीमध्ये कार जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. कार पेटल्याने परिसरात आगीचे लोट पसरले होते.
तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ मुळोबा मंदिर येथे करंदी गावातील दीपक ढोकले हे कार घेऊन दर्शनासाठी आले होते. दुपारच्या सुमारास पुन्हा परतत असताना कारच्या पुढील बाजूने आग लागल्याचे दिसले. यावेळी दीपक यांनी कारमधील आग आटोक्यात आणण्यासाठी सिलिंडर काढून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केले.
घटनेची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळताच पोलीस हवालदार महेंद्र पाटील, आत्माराम तळोले, शरद कारकुड, पोलीस पाटील पांडुरंग नरके, आपदा मित्र गणेश टिळेकर, शेरखान शेख, श्रीकांत भाडळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, जवळ आग निंयत्रणात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान, रांजणगाव औद्योगिक वसाहत व पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.





