Pimpri : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छतागृहांना टाळे

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने भाडेतत्वावर दिलेल्या जागा व गाळ्यांलगत असणाऱ्या स्वच्छतागृहांना टाळे ठोकलेले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यातही महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. ‘स्वच्छ देहूरोड, सुंदर देहूरोड’ घोषवाक्याला यामुळे हरताळ फासला जात असून ही स्वच्छतागृहे सामान्यांसाठी खुली करावी, अशी मागणी होत आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने शितळानगर, शंकरवाडी आणि मुंबई-पुणे महामार्गालगत निगडी जवळील बंद करण्यात आलेल्या जकातनाका ठिकाणची जागा व गाळे बोर्डाच्या उत्पन्नासाठी व्यवसायिकांना भाडेतत्त्वावर दिली आहे. यामुळे इथे विविध दुकाने व व्यवसाय उभारण्यात आले आहेत. अलिकडे मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी याठिकाणी येत असतात. परंतु तिथे असणारी स्वच्छतागृहे कॅन्टोन्मेंट बोर्डाने बंद केल्याचे दिसत आहे.
एकीकडे सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी असताना दुसरीकडे उपलब्ध स्वच्छतागृहे बंद ठेवल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अनेकवेळा या स्वच्छतागृहांच्या जवळच नागरिक उघडल्यावर लघुशंका करताना दिसतात. याऐवजी हीच स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली ठेवली तर निदान परिसर स्वच्छ राहील. विशेषतः महिला वर्गाची होणारी अडचण लक्षात घेता बोर्डाने ही स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करणे गरजेचे आहे.
स्वच्छतागृहांमध्येच स्वच्छतेचा अभाव
देहूरोड मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, रेल्वे स्थानक लगत, महात्मा गांधी शाळेजवळ, डॉ. आंबेडकर रोड, शितळानगर व मामुर्डी येथील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. येथे नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. तसेच अनेक स्वच्छतागृहालगत अतिक्रमणे झाली असल्याने सामान्यांना तिथे जाताही येत नाही.





