Delhi Services Ordinance : दिल्ली विधेयकाबाबत ‘बिजेडी’ची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच…

नवी दिल्ली :- राजधानी दिल्लीतील सरकारी सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकावर बिजेडी म्हणजेच बिजू जनता दलाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या विषयावर पक्षाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पण या चर्चेचा तपशील उघड झालेला नाही.
पक्षाचे राज्यसभा सदस्य अमर पटनायक यांनी सांगितले की, आमच्या पक्षांतर्गत चर्चेचा तपशील आम्हाला उघड करता येणार नाही पण पक्ष याविषयावर योग्यवेळी निर्णय घेईल. हे विधेयक पुढील आठवड्यात दोन्ही सभागृहात मांडले जाणार आहे.
ते म्हणाले की, आधी विधेयक मांडू द्या, मग पक्ष निर्णय घेईल. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षाध्यक्ष नवीन पटनायक हेच त्यावर निर्णय घेणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान संयुक्त जनता दलाने मात्र या विधेयकाला विरोधी करण्याची भूमिका घेतली असून त्यासाठी त्यांनी आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. हा व्हीप 11 ऑगस्ट पर्यंत जारी राहणार आहे. त्यामुळे हे विधेयक केव्हाही आले तरी तो व्हीप लागूच असणार आहे.





