Satara | फलटणमधून दीपक चव्हाणांविरोधात उमेदवाराची उत्सुकता

सातारा, {संतोष पवार} – फलटण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तीनदा आमदार राहिलेल्या दीपक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
लाेकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघातील नाट्यमय घडामोडीनंतर महायुतीची उमेदवार राष्ट्रवादीला की भाजपला मिळणार याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र अजित पवार यांची दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करुन यावर पडदा टाकला आहे.
आता फलटण मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवार कोण असणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
या निवडणुकीत रणजितसिंह महायुतीचे काम करणार की पुन्हा एकदा रणजितसिंह व रामराजे यांच्यात शाब्दिक युध्द होणार हेही आगामी काळात दिसून येणार आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातीसाठी (एससी) राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक चव्हाण यांनी हॅटट्रीक करत इतिहास घडवला होता.
एक शिक्षक सलग तीन टर्म मोठ्या मताधिक्क्याने आमदार होवू शकते अशी किमया विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी करुन दाखवली.
मागील तीन निवडणुकीत भाजपचा उमेदवार विरोधात होता. मात्र आता चित्र वेगळे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीनंतर अजित पवार यांनी महायुतीत जात भाजप व शिवसेनेबरोबर (शिंदे गट) सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे आता भाजप अथवा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार विरोधात नसणार आहे.
राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी लाेकसभा निवडणुकीत महायुतीत असतानाही महायुतीचे उमेदवार रणजितसिंह ना. निंबाळकर यांना आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी उघडपणे विरोध केला.
यादरम्यान उभयतांमध्ये आरोप – प्रत्यारोपही झाले. या नाट्यमय लढतीत महायुतीतील आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसला मदत केल्याने धैर्यशील मोहिते – पाटील खासदार झाले.
या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह महायुतीच्या आणि तेही रामराजेंच्या समर्थक असलेल्या उमेदवाराचे काम करतील अशी परिस्थिती मतदारसंघात नाही.
याउलट लाेकसभेच्या पराभवाचे उट्टे काढण्याची एकही संधी रणजितसिंह सोडतील असे नाही. भाजपचा उमेदवार नसला तरी चालेल मात्र रामराजेंचा उमेदवार पाडायचाच असा विडा रणजितसिंहांनी उचलला असल्याने आगामी निवडणुकीत त्याची झलक दिसणार आहे.
एकीकडे अजित पवार यांनी फलटणमधून आ. दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी श्री. चव्हाण यांना मागील तीन निवडणुकीत जसा सहजासहजी विजय मिळवता आला तशी परिस्थिती आत्ता मतदारसंघात नाही.
एकीकडे रणजितसिंहांचा विरोध आणि दुसरीकडे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष कोण उमेदवार देणार हेही तितकेच महत्वाचे असणार आहे.
रणजितसिंह आणि शरद पवार यांच्यात अंतस्थ युती झाल्यास दीपक चव्हाण यांच्या अडचणीत भर पडणार हेही तितकेच खरे आहे.
मात्र सध्या तरी या मतदारसंघात दीपक चव्हाण यांची सरशी असून आगामी काळात काय घडामोडी होतात, उमेदवारी कोणाला मिळणार यावरही मतदारसंघातील गणिते अवलंबून आहेत.
गड राखण्याचे रामराजेंपुढे आव्हान
लाेकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचे काम न करता त्यांच्या विरोधात काम करुन त्यांना धुळ चारल्याने रणजितसिंह व रामराजे यांच्यात खालच्या पातळीवर आरोप – प्रत्याराप सुरु आहेत.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह महायुतीचे काम करणार नाहीत हेही सत्य आहे. पराभवानंतर रणजितसिंहांनी मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकरांसह काही पदाधिकारी रामराजेंना सोडून भाजपच्या कळपात सामील झाले. याशिवाय शिवरुपराजे खर्डेकर आणि रामराजे यांच्यातही जुंपली आहे.
अशी परिस्थिती असताना रणजितसिंहांनी रामराजेंच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी व्यूहरचना आखली असून त्यानुसार भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे राजकारण धुरंधर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामराजेंना गड राखण्याचे मोठे आव्हान रणजितसिंहांनी दिल्याचेच दिसत आहे.





