उमेदवारांनो सावधान! फुकटात सभा घ्याल तर कारवाई अटळ; पालिकेने जारी केले नवे दरपत्रक

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिकेच्या परवानगीविना प्रचारासाठी कोपरा, चौक सभा घेणे उमेदवारांना महागात पडणार आहे. या सभांसाठी पालिकेने जागांचे दर निश्चित केले आहेत. दर भरल्याशिवाय सभा घेतल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकाऱ्यास देणार असून त्यानुसार कारवाई होईल. सभेसाठी प्रती चौरसमीटर ९ रूपये शुल्क पालिकेने निश्चित केले आहे.
चौक सभेसाठी किमान २० हजार तर कोपरा सभेसाठी ८ हजार २०० रूपये मोजावे लागणार आहेत. आकाशचिन्ह-अतिक्रमण विभागाने याचे आदेश काढले आहेत. या पूर्वी अनेक उमेदवार प्रचारसभा संपल्यानंतर केवळ पोलिसांची परवानगी घेवून सभा घेत असत, त्यामुळे महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
असे असतील दर
– चौक सभा : ४ ते पाच हजार नागरिकांसाठी २ हजार चौरसमीटर जागेसाठी १८ हजार रूपये भाडे तर २ हजार रूपये साफसफाई शुल्क असेल. याशिवाय १० हजार अनामत रक्कम असेल.
– कोपरा सभा : २००० ते अडीच हजार नागरीकांसाठी ८०० चौरसमीटर जागेसाठी ७ हजार २०० रूपये भाडे तर १ हजार रूपये साफसफाई शुल्क असेल. या शिवाय ४ हजार रूपये अनामत रक्कम असेल.
– सभेसाठी शाळा, ॲमेनिटी स्पेस, रिकामी जागांसाठी मागणीनुसार प्रती चौरस मीटर ९ रूपये दराने शुल्क आकारले जाईल. तसेच १ हजार रूपये सफाई शुल्क असेल. याशिवाय, प्रती दिवस जे भाडे निश्चित होईल त्याच्या ५० टक्के अनामत रक्कम असेल.
सभांसाठी अटी
– विनापरवानगी सभा घेतल्यास दिडपट शुल्क
-शुल्क न भरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास कळविणार.
– सभेसाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक.
-सभेसाठी खड्डे न घेता १० फूट लांबी-रूंदीचे स्टेज आवश्यक
– खड़े घेतल्यास प्रती खड्डा २ हजार दंड आकारणार.
– एका जागेसाठी दोन अर्ज आल्यास निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार.





