अस्वस्थता असल्याने घरातच उमेदवारी ; रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला

बारामती – अजित पवार यांच्या पक्षात अस्वस्थता आहे. ती त्यांना माहित आहे. ती अस्वस्थता असल्याने कोणावरच विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळेच अजित पवार यांनी घरातील व्यक्तीला राज्यसभेची उमेदवारी दिली असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बहुतांश नेत्याची इडी नाहीतर सीबीआयची चौकशी चालू होती, विकास निधीसाठी, सत्तेसाठी ते लोक गेली आहेत, त्यामुळे शरद पवार यांच्यापासून फारकत घेतेलेल्या नेत्यांच्याकडे एकच कारण होत ते म्हणजे स्वार्थ आणि स्वार्थ असलेल्या नेत्यांचे जर का समाधान नाही झाले तर ते भाजपा सोबतसुद्धा जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राजकीय दृष्टीकोनातून योग्य असू शकतो.
जर जवळचा मुलगा किंवा पत्नी असेल तर ते आपल्याला सोडून जाणार नाहीत. बाकीच्या नेत्यांचा काही भरोसा नाही, माझे तर स्पष्ट मत आहे की, त्यांच्याकडचे आमदार आणि खासदार जास्त काळ राहतील याची शाश्वती देता येत नाही.
विकासकामाबाबत भाजपाने पेपर वर्क करण्याच्या पलीकडे काहीच कामे केली नाहीत. फक्त गंडवागंडवी केली आहे. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपाला नाकारले आहे. येत्या काळात महायुती किती काळ टिकेल हे सांगता येत नाहीत. त्यामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसांत महायुती टिकेल असं वाटत नाही, असेही मत पवार यांनी व्यक्त केले.





