Manjari Budruk: मांजरी बुद्रुकमध्ये कालवा ओव्हरफ्लो; घुले वस्तीत घरांमध्ये पाणी, परिसरात वाहतूक कोंडी
Manjari Budruk: घटनेची माहिती मिळताच जॅकवेलमधील मोटार तात्काळ बंद करण्यात आली आणि कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला. मात्र तोपर्यंत परिसरात मोठे नुकसान झाले होते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Manjari Budruk: मांजरी बुद्रुक येथील घुले वस्ती परिसरात मंगळवारी सायंकाळी जुन्या मुळा-मुठा कालव्याला ओव्हरफ्लो आल्याने मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. सायंकाळी साडेपाच ते सात या दरम्यान कालव्याचे पाणी काठ ओलांडून रस्त्यावर आले. घुले वस्तीपासून रेल्वे गेटपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले.
मुंढवा येथील महापालिकेच्या जॅकवेल प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी कालव्यात सोडण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने पाणी साचून कालवा ओव्हरफ्लो झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांचे मोठे नुकसान –
कालव्यालगतच्या सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. घरातील वस्तूंचेही मोठे नुकसान झाले असून नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. परिसरात मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.
तातडीची कारवाई –
घटनेची माहिती मिळताच जॅकवेलमधील मोटार तात्काळ बंद करण्यात आली आणि कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला. मात्र तोपर्यंत परिसरात मोठे नुकसान झाले होते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.





