संसर्ग झालेल्या व्यक्तीला पाहून डोळ्यांचा फ्लू पसरतो का? ; जाणून घ्या खरं कारण

नवी दिल्ली : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये, अगदी आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांमधून डोळ्यांच्या फ्लूचा म्हणजे ‘डोळे येणे’ हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डोळ्याच्या फ्लूला ‘कॉंजक्टिव्हायटिस’ किंवा ‘पिंक आईज प्रॉब्लेम’ असेही म्हणतात. डोळ्यांना होणारा हा संसर्ग जिवाणू किंवा विषाणूजन्य अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. राजधानी दिल्लीत पूर आणि पावसामुळे अचानक डोळ्यांच्या या आजाराचा धोका खूप वाढला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्व लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
या प्रकारात डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, डोळ्यांना लालसरपणा, खाज सुटणे आणि पाणी येण्याची समस्या सुरू होते. बहुतेक प्रकरणांमध्ये, त्याची लक्षणे सौम्य असतात, परंतु काही प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका असू शकतो. चला तर, डोळे येण्याची कारणे आणि प्रतिबंध याबद्दल आपण सविस्तरपणे समजून घेऊ.
गेल्या 10 दिवसांपासून सामान्य फ्लू आणि डोळ्यांच्या फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तसेच वैयक्तिक स्वच्छतेबाबत खूप निष्काळजीपणा दिसून येत आहे, त्यामुळे डोळ्यांच्या फ्लूचे रुग्ण वाढले आहेत.
* संक्रमित व्यक्तीला पाहूनही संसर्ग होऊ शकतो का?
आय फ्लू फक्त संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कामुळे होऊ शकतो. जसे की वैयक्तिक वस्तू शेअर करणे, स्वच्छतेची काळजी न घेणे, डोळे व्यवस्थित न साफ करणे किंवा दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर त्याच हाताने डोळ्यांना स्पर्श करणे. जवळच्या संपर्काशिवाय संसर्गाचा धोका नसतो.
हा एक सामान्य गैरसमज आहे की आय फ्लू एखाद्याच्या डोळ्यात पाहून पसरतो. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डोळ्यांच्या स्त्रावाच्या संपर्कात येत नाही, तोपर्यंत संसर्गाचा धोका नाही.
* पृष्ठभागांवरून संसर्ग होऊ शकतो
आय फ्लूचा विषाणू दरवाजाच्या हँडल, टॉवेल किंवा टिश्यूजसारख्या पृष्ठभागावर सक्रिय राहतो, त्यामुळे अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात चांगले धुणे आवश्यक आहे. गर्दीच्या वातावरणामुळे आणि संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कामुळे विषाणू वेगाने पसरू शकतो, अशा प्रकारे प्रतिबंध करण्याच्या पद्धतींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
* स्वत: औषधोपचार करू नका
जर तुम्हाला डोळ्याच्या फ्लूची लक्षणे दिसत असतील तर त्याबद्दल तज्ञांशी संपर्क साधा आणि उपचार करा. कोणतीही ओव्हर द काउंटर औषधे किंवा आयड्रॉप स्वतः वापरू नका कारण ते तुमचा धोका वाढवू शकतात. डोळ्यांच्या इतर अनेक समस्यांमध्ये आय फ्लू सारखीच लक्षणे असू शकतात, त्यामुळे लक्षणांचे नेमके कारण शोधून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे.




