चीन एआय क्षेत्रातील अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणार? या तंत्रज्ञानात भारत मागे आहे का?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे भविष्य आहे, असे आपण सर्वसाधारणपणे ऐकतो-वाचतो. मात्र, एआय हे भविष्य नसून वर्तमान आहे हे आता मान्य करायला हवे. कदाचित तुम्ही वाचत असलेला लेखही एआयच्या मदतीने लिहिलेला असू शकतो. तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेले व्हीडिओ देखील एआयच्या मदतीने बनवलेला असण्याची शक्यता अधिक आहे.
आज बहुतांश कामामध्ये जनरेटिव्ह एआयचा वापर वाढला आहे. मात्र,आतापर्यंत एआय क्षेत्रात वर्चस्व असलेल्या अमेरिकेला आता धक्के बसू लागले आहेत. याची सुरुवात झाली ती चीनच्या डीपसीक एआयने.
अगदी कमी खर्चात निर्मिती झालेल्या या एआय मॉडेलमुळे अमेरिकेच्या टेक क्षेत्रातील कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. तर डीपसीक पाठोपाठ चीनमधील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या अलिबाबाने देखील नवीन एआय मॉडेल लाँच केले. त्यामुळे एआयमधील अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्के मिळण्याची सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. यासोबतच, भारत या तंत्रज्ञानात इतर देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे का? याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.
डीपसीक नक्की काय आहे?
डीपसीक हे एक जनरेटिव्ह एआय चॅटबॉट आहे. या एआयआधारित लार्ज लँग्वेज मॉडेलची निर्मिती चीनच्या लिआंग वेनफेंग या तरुणाने केली आहे. इतर चॅटजीपीटी, मेटा, गुगल जेमानाई, मायक्रोसॉफ्ट कोपायलट प्रमाणेच हे एआय मॉडेल देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, गणितं सोडवू शकते, डेटाचे विश्लेषण करू शकते. तसेच, कोडिंग करण्यास देखील सक्षम आहे.
वर्ष 2023 मध्ये लिआंग वेनफेंग यांनी डीपसीक नावाची कंपनी स्थापन केली. त्यानंतर 2024 मध्ये पहिलं लार्ज लँग्वेज मॉडेल लाँच केले व आता डीपसीकचं R1 मॉडेल सर्वांसाठी उपलब्ध केले आहे.
या नवीन मॉडेलच्या लाँचनंतरच याची सर्वाधिक चर्चा सुरू झाली. हे अल्पावधीतच अमेरिकेसह अनेक देशांमध्ये सर्वात लोकप्रिय मोफत एआय अॅप बनले. याची लोकप्रियता एवढी वाढली की याचा फटका आघाडीची चीप निर्माता कंपनी एनव्हीडियाला बसला. एकाच दिवसात या कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 600 अब्ज डॉलर्सने कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
डीपसीकची एवढी चर्चा का?
डीपसीक हे काही पहिले एआय आधारित जनरेटिव्ह चॅटबॉट नाही. मात्र, याची सर्वाधिक चर्चा होण्यामागचे कारण याची निर्मिती आहे. ओपनएआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडिया सारख्या अमेरिकन कंपन्यांकडून एआयशी संबंधित पायाभूत सुविधा व निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच ओपनएआयने ‘स्टारगेट’ प्रोजेक्टसाठी पुढील 4 वर्षात तब्बल 500 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे. मात्र, दुसरीकडे डीपसीकनुसार हे चॅटबॉट बनवण्यासाठी फक्त 60 लाख डॉलर्स खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर आतापर्यंत टेक कंपन्यांकडून एआय मॉडेलच्या निर्मितीसाठी उच्च गुणवत्तेच्या चिप्सची गरज असल्याचा दावा केला जात असे. मात्र, डीपसीकला प्रशिक्षण देण्यासाठी केवळ 2 हजार चिप्सचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, यासाठी कमी प्रगत असलेल्या एनव्हीडियाच्या एच800 चिप्सचा वापर करून अवघ्या 2 महिन्यात याची निर्मिती करण्यात आली. याच कारणांमुळे अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. यानिमित्ताने एआयचे ‘अर्थशास्त्र’ डीपसीकच्या माध्यमातून बदलू लागले आहे, असेही म्हणता येईल.
डीपसीक vs चॅटजीपीटी
डीपसीकआधी ओपनएआयच्या चॅटजीपीटीची विशेष चर्चा झाली. डीपसीक हे चॅटजीपीटीपेक्षा अधिक चांगले असल्याचाही दावा केला जातो. मात्र, दोन्हींमधील क्षमता काहीप्रमाणात समानच असल्याचे दिसून येते.
या दोन्ही एआय मॉडेलच्या मदतीने कोडिंग, भाषांतर, गणितं सोडवणे, माहितीचे विश्लेषण अशी अनेक कामे मिनिटात करणे सहज शक्य आहे. मात्र, यातील मूळ फरक आहे प्रश्नांचे उत्तर देण्याची क्षमता. डीपसीक हे चॅटजीपीटीच्या तुलनेत अनेक प्रश्नांची उत्तरे अधिक सविस्तर व मुद्देसूद देते. तर अनेक कामांमध्ये चॅटजीपीटी हे डीपसीकला वरचढ ठरते. डीपसीक हे अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरे देणे टाळत असल्याचेही दिसून आले आहे.
डीपसीक हे ओपन-सोर्स एआय मॉडेल आहे. याशिवाय, ते मोफत देखील आहे. तर दुसरीकडे चॅटजीपीटी हे मोफत व शुल्क या दोन्ही पर्यायांसह येते.
चीन एआय क्षेत्रात अमेरिकेला धक्का देऊ शकेल का?
डीपसीकची लोकप्रियता एआयच्या क्षेत्रात अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. डीपसीकपाठोपाठ चीनची टेक कंपनी अलीबाबानेही क्वेन 2.5 मॅक्स (Qwen 2.5-Max) हे एआय मॉडेल लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे मॉडेल डीपसीक आणि चॅटजीपीटीपेक्षाही उत्तम आहे.
मात्र, चीनच्या एआय मॉडेलमुळे या क्षेत्रातील अमेरिकेच्या एकहाती वर्चस्वाला धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एआयचे केंद्र असलेल्या अमेरिकेला यामुळे नक्कीच हदरे बसण्यास सुरुवात झाली आहे. डीपसीकवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया देत हा सर्वांसाठी ‘जागं करणारा इशारा’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या तरी या क्षेत्रात अमेरिका आघाडीवर आहे यात दुमत नाही. मात्र, डीपसीकच्या उदयामुळे इतर देशांना देखील कमी खर्चात अधिक चांगल्या तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यास प्रेरणा मिळू शकेल. त्यामुळे भविष्यात अमेरिकेला एआय तंत्रज्ञानामध्ये आणखी मोठे धक्के बसल्यास आश्चर्य वाटायला नको.
भारत एआयमध्ये मागे आहे का?
एकीकडे अमेरिका आणि चीन हे एआय तंत्रज्ञानामध्ये मक्तेदारी मिळवण्यासाठी स्पर्धा करत असताना या शर्यतीत भारत खूपच पिछाडीवर असल्याचे दिसून येते. यामागचे सर्वात प्रमुख कारण हे एआयशी संबंधित पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक व धोरण हे आहे. भारतात एआय तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक खूपच कमी असल्याचे दिसून येते.
भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मागील काही वर्षात प्रगती झाली आहे. याशिवाय, इंजिनिअरिंगची संख्याही सर्वाधिक आहे. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन व विकासासाठी हवे तसे पूरक वातावरण उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
2024, सरकारने इंडियाएआय मिशनसाठी 10,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीला मान्यता दिली होती. यांतर्गत पुढील 5 वर्षात भारताची एआय इकोसिस्टम तयार करणे हा उद्देश आहे. याशिवाय, डीपसीकनंतर आता पुढील काही महिन्यात एआयचे फाउंडेशनल मॉडेल भारतात उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सार्वजनिक कॉम्प्युटिंग फॅसिलिटी अंतर्गत 18,693 ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात भारताला एआय तंत्रज्ञानामध्ये अमेरिका-चीनला टक्कर द्यायची असल्यास मोठी झेप घ्यावी लागेल हे नक्की.





