रुसवे फुगवे असूनही युती आघाडीचा प्रचार सुरु

जिल्ह्यात दोन्ही बाजूने काही नेते प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र
प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव – सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपतर्फे खासदार उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदश्चंद्र पवार गट) आमदार शशिकांत शिंदे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. युती- आघाडी झाली असली तरी प्रचारामध्ये अजूनही सर्वच नेते सक्रिय झाल्याचे जाणवत नसल्याचे चित्र आहे.
महायुतीतील तिन्ही पक्ष यावेळी इच्छुक होते. भाजपतर्फे खासदार उदयनराजे भोसले, माथाडी नेते नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील तर शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव अशा इच्छुकांनी प्रयत्न केले. जागा भाजपकडे तिकीट मिळाल्यानंतर इतर पक्षातील इच्छुक काहीसे नाराज आहेत. अजित पवार गटाचा प्रचारातील सहभाग अजून वाढायला हवा, असे कार्यकर्ते सांगतात. शिवसेनेचे जिल्ह्याचे नियोजन पाहणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडच्या महायुतीच्या मेळाव्यात निवडणुकीत मायक्रोप्लनिंगची गरज व्यक्त केली. तरीही जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये एकोपा दिसत नाही. इच्छुक व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा रुसवा अजून गेलेला नाही. उदयनराजे व त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राजकीय संघर्ष सर्वांना माहीत आहे.
आता दोन्ही बंधू जरी भाजपमध्ये आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते एकजुटीने काम करण्याची शक्यता आहे.
जी अवस्था महायुतीमध्ये तीच अवस्था महाविकास आघाडीमध्ये आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे जिल्ह्यात सर्वात विस्कळीत झालेल्या या संघटनेत अजूनही एकजिनसीपणा दिसून येत नाही. शेखर गोरे वगळता इतर जिल्हाप्रमुख फक्त आपल्या तालुक्यासाठी थोडेफार नियोजन करताना दिसत आहे. काँग्रेसची मर्यादित पण आहे ती ताकद आघाडीच्या पाठीमागे आहे. सातारा जिल्हा शरद पवार यांचे नेतृत्व नेहमीच मानत आला आहे. परंतु, पक्षफुटीनंतर ही पहिली निवडणूक असल्याने ते पक्षाच्या विजयासाठी अथक प्रयत्न करतील हे नक्की आहे. पवार यांच्याप्रमाणे उदयनराजे यांचाही जिल्ह्यात एक मोठा चाहता वर्ग आहे. ते युवकांचे आँयडाँल आहेत. त्यांनी प्रचारातही मोठी आघाडी घेतली आहे. हे सर्व जरी खरे असले तरी युती व आघाडीचे जे मित्र प्रामाणिकपणे काम करणार की नाही याचीच चर्चा राजकीय गोटात आहे.
युती- आघाडीकडून मान्यवर नेते प्रचारात
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, मनोज घोरपडे, अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नरेंद्र पाटील, मूळ भाजप कार्यकर्ते व सलंग्न संघटना उदयनराजे यांच्या प्रचारात दिसत आहेत. तर उमेदवारी जाहीर झाल्यापासून शशिकांत शिंदेही पूर्ण मतदारसंघात संपर्क साधत आहेत. काँग्रेसच्यावतीने पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर आदी नेतेमंडळी आघाडीच्या प्रचारात सहभागी होत आहेत. भाजपकडून ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिलला कराड येथे जाहीर सभा होणार आहे. आघाडीच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह आघाडीचे स्टार प्रचारक सहभागी होणार आहेत.





