सातारा – यशवंत विचारांवर बोलण्याची महेश शिंदे यांची लायकी नाही

सातारा – शरद पवार देशाचे नेते असून त्यांनी नेहमीच यशवंत विचारांची पाठराखण केली आहे. शरद पवारांंबाबत आणि यशवंत विचारांबाबत बोलण्याची आमदार महेश शिंदे यांची लायकी नाही. शरद पवार आमचे दैवत असून आमच्या दैवताला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा सातारा लाेकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी दिला.
सातारा येथे पत्रकार परिषदेत रविवारी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप करताना आ. महेश शिंदे यांनी यशवंत विचारांवरुन शरद पवार यांच्यावरही टीका केली. याबाबत आ. शशिकांत शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार यांनी केलेला संघर्ष पाहिला आहे ती व्यक्ती त्यांच्यावर कधीच टीका करणार नाही. सत्ताधारी असो अथवा विरोधक असो, शरद पवार यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे. मात्र, अपघाताने निवडून आलेल्या महेश शिंदे यांनी कधी माझ्यावर तर कधी शरद पवारांवर आरोप व टीका सुरु केली आहे. मुळात त्यांनी गद्दारी केली असून अशा गद्दारांना यशवंत विचारांवर बोलण्याचा अधिकारच नाही. आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय याचेही भान त्यांना दिसत नाही.
सातारा लाेकसभा मतदारसंघात माझ्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कधी नरेंद्र पाटील तर कधी महेश शिंदे टीका करत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्ही एक रुपयाचाही गैरव्यवहार केला नाही. आम्हाला मिळणाऱया प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने बिनबुडाचे आणि तथ्यहिन आरोप करण्यात येत असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
महेश शिंदेना कायदेशीर नोटीस देणार- आ. शिंदे
महेश शिंदे यांच्या टीकेला, आरोपांना फारसे महत्व देत नाही. मी लाेकशाही मानणारा आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत न्यायालयाने आम्हाला दोषी ठरवलेले नाही. कोणताही आक्षेप ठेवला नाही. लाेकशाही मानत असल्याने आणि सध्या देशात यंत्रणांचा चुकीच्या पध्दतीने वापर होत असल्याने आम्ही न्यायालयातून जामीन घेतला आहे. आम्ही जामीन घेतला म्हणजे आरोपी झालाे असे नाही. अशी परिस्थिती असताना महेश शिंदे यांनी मला फरारी आरोपी म्हणणे चुकीचे आहे. याबाबत महेश शिंदे यांना आजच मी कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याची माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.





