पिंपरी | लाडकी बहीण योजनेसाठी भिसेगाव येथे शिबिर

कर्जत (वार्ताहर) – तालुक्यातील भिसेगाव येथे लाडकी बहीण योजनेसाठी विशेष शिबिर घेण्यात आले. यंदा पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारकडून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर करण्यात आली. तसेच तत्काळ ही योजना लागू देखील करण्यात आली.
परंतु योजनेचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळवावा, याबद्दल महिलांमध्ये माहितीचा अभाव असल्याने ही पोकळी भरून काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी आणि ज्योती कुलकर्णी यांच्याकडून भिसेगाव येथे विशेष शिबिर घेण्यात आले.
शिबिरात लाडकी बहीण योजनेसह इतरही विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले आणि नागरिकांना दाखले वितरित करण्यात आले. शिबिरात एकूण १८० महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. तर ३० महिलांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज भरले.
शिबिरात एकूण ८० नागरिकांची जन्म, मृत्यू नोंदणी झाली. अनेक नागरिकांना अधिवास प्रमाणपत्रे देण्यात आली. २५ आदिवासी नागरिकांना शबरी योजनेसाठी उत्पन्न दाखले, ४८ नागरिकांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले.
माजी आमदार सुरेश लाड, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण करण्यात आले. अंगणवाडी सेविका कुसुम भरकले, सुनीता कदम, करुणा गायकवाड, अर्चना जोशी, जयश्री बडेकर, नर्मदा वांजळे,
दिव्या पालकर यांनी योजनांसाठीचे अर्ज भरून घेतले. यावेळी नायब तहसीलदार बाचम, कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संकेत भासे, उमेश गायकवाड, रवी लाड, बापू गोसावी, अविनाश पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, माजी तालुका प्रमुख बाळाजी विचारे आदी उपस्थित होते.
शासनाच्या असंख्य योजना आहेत. मात्र त्या कशा मिळवायच्या हे सामान्य नागरिकांना माहिती नसते. तर बहुतांश योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. लाडकी बहीण योजनेबाबत हे होऊ नये, यासाठी हे शिबिर घेण्यात आले. – अमोघ कुलकर्णी





