Satara News : भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाने होणार वासरांची निर्मिती, राज्यात पहिलाच उपक्रम

सातारा : दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वासरांची निर्मिती होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उच्च वंशावळ असणाऱ्या गायीच्या स्रीबीज कोषातून एका विशिष्ट सोनाग्राफी यंत्राच्या सहाय्याने गायी, म्हशीच्या गर्भाशयात भ्रूण प्रत्यारोपित करण्यात येणार आहे. हा उपक्रम राबवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद ठरली आहे. या योजनेतर्गत लाभार्थीना ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेला जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत मंजुरी देण्यात आली असून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ४ लाख रुपयांची प्रायोगिक तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने पशुपालकांच्या समस्येत भर पडत असून दूध उत्पादनात देश प्रथम क्रमाकावर असला तरी प्रति गाय दूध उत्पादन इतर विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे.
जनावरांची कमी असणारी उत्पादन क्षमता, वंध्यत्व व इतर प्रजनन अकार्यक्षमतेमुळे दोन वेतातील अंतर वाढले आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न होत असून त्याचाच एक भाग म्हणून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (एन्त्रिओ ट्रान्स्फर टेक्नॉलॉजी) वापरुन कमी उत्पादन असणाऱ्या पशुधनापासून उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या वासरांच्या जन्मासाठी केला जाणार आहे. यामुळे दुग्ध व्यवसायात मोठी क्रांती होण्यास मदत होणार आहे.
या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उच्च वंशावळ असणाऱ्या गायीचे सीबीज प्रयोगशाळेत आपल्याला पाहिजे त्या वळूच्या वीर्याच्या सहाय्याने फलित केले जाते. तयार होणारे भ्रूण दायी गायी, म्हैशींच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते. हे तंत्रज्ञान लिंग विनिच्छित वीर्यामात्रेचा वापर करुन ९० टक्केपर्यंत फक्त कालवडींची (मादी वासरे) पैदास करणे शक्य असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
सद्यस्थितीत शासकीय वळू माता प्रक्षेत्र ताथवडे, पुणे यांच्या प्रक्षेत्रावर जनावरांना भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरुन जातीवंत कालवडींची पैदास केली जाते. यामध्ये प्रामुख्याने पंढरपुरी म्हैस, खिल्लार, गीर, साहिवाल, थारपारकर, जर्सी व होस्टेन फ्रिजियन या गायींचा समावेश आहे. भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमार्फत २१ हजार सेवा शुल्काच्या मोबदल्यात पशुपालकांना उच्च उत्पादन क्षमता असणारा गायी, म्हशींची गर्भधारणा करुन देण्यात येते.
पशुपालकांसाठी ही रक्कम जास्त असल्याने इच्छा असूनही बहुतांश पशुपालक या तंत्रज्ञानाच्या लाभापासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेने ९० टक्के अनुदानावर हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील वातावरणात वाढलेल्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी, म्हशींसाठी या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास नक्कीच दूध उत्पादन वाढून पशुपालकांचा दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती डॉ. विनोद पवार यांनी दिली.
जिल्हा परिषद सेसमधून प्रायोगिक तत्वावर भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करुन उच्च क्षमता असणाऱ्या कालवडींची पैदास करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. एकूण खर्चाच्या ९० टक्के अनुदान जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे.
– याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी





