सातारा (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे तथा मतदार यादी निरीक्षक सातारा जिल्ह्यास 7 ऑगस्ट रोजी भेट देणार आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व विदयमान खासदार, आमदार तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह येथे सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. सदर बैठकीस सर्व मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे मतदार यादी व मतदान केंद्र सुसुत्रीकरणाच्या अनुषंगाने आढावा घेणार आहे. मतदार यादीतील नोंदणी, वगळणी इत्यादी तसेच मतदार यादयांचे शुध्दीकरण याबाबत मतदार, नागरिक व राजकीय प्रतिनिधी यांना काही सुचना सादर करावयाच्या असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.