Abhishek Porel Arrest : क्रिकेट विश्वात खळबळ! दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ स्टार खेळाडूला तातडीने अटक करा; कोलकाता हायकोर्टाचा पोलिसांना थेट आदेश
Abhishek Porel Arrest : दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

Abhishek Porel Arrest Order Calcutta High Court : भारतीय क्रिकेट जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणारा आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेत पोलिसांना या युवा क्रिकेटपटूला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले आहेत. एका तरुणीने अभिषेकविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.
नेमका काय आहे गुन्हा आणि आरोप?
गेल्या महिन्यात एका महिलेने अभिषेक पोरेलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अभिषेकने लग्नाचे खोटे आमिष दाखवून आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याशिवाय अभिषेकवर मारहाण करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे यासारखेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील मोगरा पोलीस ठाण्यात अधिकृतपणे एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे.
मोबाईल-लॅपटॉप जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश –
🚨 Arrest Warrant against ABHISHEK POREL 🚨
The Calcutta High Court has ordered the immediate arrest of Delhi Capitals cricketer Abhishek Porel after a medical student accused him of se*ual harassment and blackmail using intimate photos. ( Dainik Jagran ) pic.twitter.com/qGnK6IhTWR
— CricInformer (@CricInformer) July 19, 2026
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोलकाता हायकोर्टाने केवळ अटकेचे आदेश दिले नाहीत, तर तपासाला वेग देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. न्यायालयाने पोलिसांना अभिषेक पोरेलचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, मोबाईल आणि लॅपटॉप तातडीने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी आणि इंटरनेटवर कोणताही संवेदनशील डेटा किंवा आक्षेपार्ह माहिती लीक होऊ नये, यासाठी कोर्टाने हा कडक निर्णय घेतला आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार असून, पोलिसांना तोपर्यंत तपासाचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
अभिषेक पोरेलची क्रिकेट कारकीर्द धोक्यात?
२३ वर्षीय अभिषेक पोरेलने आतापर्यंत ३२ फर्स्ट क्लास आणि २३ लिस्ट-ए सामने खेळले आहेत. २०२३ पासून तो आयपीएलचा भाग आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने आतापर्यंत ३५ आयपीएल सामने खेळले असून आपल्या स्फोटक फलंदाजीने छाप पाडली आहे. मात्र, या गंभीर गुन्हेगारी प्रकरणाने त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.





