‘मंत्रिमंडळाची धांदल’; अन् पवार कुटुंबीयांत भेटीगाठी ; सहयोगी पक्षांमध्ये चलबिचल

पुणे – राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची धांदल सुरू असताना पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. रात्री उशिरा खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्याऐवजी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीला गेले. तर, श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीनिवास पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर श्रीनिवास आणि अजित पवार यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.
राजकीय भूकंपानंतर मंत्रीमंडळ विस्तारावेळीच पवार कुटुंबीयांत सुरू असलेल्या या भेटीगाठींची चर्चा सध्या इतर पक्षांतही सुरू आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक वर्षा बंगल्यावर झाली. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावर चर्चा झाल्यानंतर अजित पवार त्यांच्या देवगिरी बंगल्यावर न जाता त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्याकडे गेले.
श्रीनिवास हे काल रात्री परदेशातून आले असल्याचे सांगितले जात असताना त्याचवेळी श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र हे शरद पवारांकडे गेले होते. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत, याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत श्रीनिवास यांच्याकडे फोनद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीनिवास हे परदेशी असल्याने अजित पवार यांची भेट होऊ शकली नव्हती परंतु, ते आल्यानंतरा श्रीनिवास आणि अजित पवार यांची तातडीची भेट होऊन दिर्घ चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून सांगितले जात आहे.




