हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारक आराखड्यास मंजुरी

पुणे – राजगुरूनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारकाच्या विकास आराखड्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंगळवारी मान्यता प्रदान केली. हा आराखडा मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेसाठी सांस्कृतिक कार्य विभागास सादर करण्यात येणार आहे.
विधानभवन येथे आयोजित या बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे आदी उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या अनुषंगाने तयार केलेल्या विकास आराखड्याचे सादरीकरण वास्तुविशारदांनी केले.
यावेळी आमदार मोहिते पाटील यांनी विविध सूचना मांडल्या. टप्पा क्र. 1 हा पुरातत्व विभागामार्फत विकसित करण्यात येणार असून 94 कोटी 99 लाख रुपये खर्चाचा आराखडा यात समाविष्ट आहे. यामध्ये जन्मखोली, थोरला वाडा, मुख्य दरवाजा व स्मारकाचा जीर्णोद्धार, वाचनालय, कॅफेटेरिया आदी तसेच रामघाट, चांदोली घाट, दरवाजा व पायऱ्या, संरक्षित भिंत, वाहनतळ, पदपथ, अंतर्गत रस्ते, जमीन सौंदर्यीकरण, खुले सभागृह, पुतळे, शिल्पे, संपूर्ण स्मारकाचे विद्युतीकरण, प्रकाश व ध्वनी सादरीकरण आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तर टप्पा क्र.2 व 3 हा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकसित करण्यात येणार असून 159 कोटी 12 लाख रुपये खर्चाचा आहे. टप्पा 2 मध्ये संग्रहालय, तालिम, देशभक्त निवास, कॅफेटेरिया, वाचनालय, वाहनतळ विकास, अस्तित्वातील रस्त्यांचा विकास, फर्निचर, विद्युतीकरण, परिसर विकास आदी बाबींसाठी 77 कोटी 82 लाख रुपये तर टप्पा क्र. 3 मध्ये नदीघाट विकास, गार्डन, संरक्षण भिंत, डिस्प्ले, म्युरल्स, होलोग्राम प्रोजक्शन व इतर बाबी यासाठी 58 कोटी 62 लाख रुपये तरतूद असून टप्पा 2 व 3 च्या भूसंपादनासाठी 22कोटी 68 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





