Pune | ओला-उबेरविरुद्ध कॅबचालक आक्रमक

पुणे, – ओला, उबेर सारख्या ऑनलाइन कंपन्यांचा परवाना आरटीओने रद्द करूनही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियासोबत करारबद्ध असणाऱ्या एरोमॉलमध्ये बेकायदा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे येत्या ११ डिसेंबर रोजी एरोमॉल येथे कॅब चालकांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर कॅब चालक प्रवाशांना थेट सेवा प्रदान करणार असल्याची माहिती भारतीय गीग कामगार मंचाचे डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने ऑनलाइन कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांचा परवाना नाकारला आहे. तरीही या कंपन्याकडून सेवा सुरू आहे. या कंपन्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्याकडून प्रवाशांना जादा भाडे आकारले जात आहे.
मात्र, या कंपन्या चालकांना योग्य तो सरकार मान्य मोबदला न देता मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. कंपन्यांच्या या नफेखोरी प्रवृत्तीमुळे प्रवासी आणि चालक दोघांची आर्थिक लूट होत आहे. याबाबत वारंवार पुणे विमानतळाचे संचालक आणि एरोमॉलचे उपाध्यक्ष यांना तक्रार करूनही त्यांनी ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणाार आहे. या दिवशी कॅब चालक प्रवाशांना थेट सेवा देणार, असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.





