BYD super-fast charging system: इलेक्ट्रिक कार फक्त पाच मिनिटांत होणार पूर्ण चार्ज

शांघाय – चीनच्या बीवायडी या इलेक्ट्रिक कार निर्माण करणार्या कंपनीने फक्त पाच मिनिटात ईलेक्ट्रीक कार पूर्ण चार्ज करणारे तंत्रज्ञान विकसित केले असल्याचा दावा केला आहे. यानंतर कंपनीच्या शेअरच्या भावात सहा टक्क्यापर्यंत वाढ झाली. सध्या इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी घेण्याची ग्राहकांची इच्छा असते.
मात्र चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. त्याचबरोबर चार्जिंगसाठी जुन्या पेट्रोल, डिझेल गाड्यापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे ग्राहक अशा कार खरेदी करण्याबाबत फारसे उत्साही नसतात. आता बीवायडी कंपनीने म्हटले आहे की, आम्ही सुपर हिट प्लॅटफॉर्म नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यावरून 1,000 किलो वॅट वेगाने चार्जिंग होते. म्हणजे कारचे चार्जिंग फक्त पाच मिनिटात पूर्ण होते आणि अशी कार 400 किलोमीटर पर्यंत चालू शकते.
बीवायडी ही चीन मधील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माण करणारी कंपनी असून ईलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला ती जागतिक पातळीवर स्पर्धा देत आहे. कंपनीने फास्ट चार्जिंगची सुविधा उपलब्ध करणार असल्याचे सांगितल्यानंतर हाँगकाँगमधील शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरचा भाव सहा टक्क्यांनी वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला. त्याचबरोबर जानेवारीपासून या कंपनीच्या शेअरचा भाव 50 टक्क्यांनी वाढला आहे. तर टेस्टला कंपनीच्या शेअरचा भाव वेगाने कमी होत आहे.
बीवायडी कंपनीचे अध्यक्ष बँग चुंगफू यांनी सांगितले की, आता आमच्या चार्जरमुळे पूर्वी पेट्रोल भरण्यास जेवढा काळ लागत होता तेवढाच काळ पूर्ण चार्जिंगसाठी लागणार आहे. अशा अवस्थेत ग्राहकांना इलेक्ट्रिक कार घेऊन ते वापरणे पूर्वी इतकेच सोपे होणार आहे. यामुळे परंपरागत इंधनावरील कार लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विश्लेषकांनी सांगितले की, जर ही बातमी खरी असेल तर यामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलेल. चीनच्या स्पर्धक कंपन्यांना मोठी अडचण होईल. मात्र हे तंत्रज्ञान कधी उपलब्ध होईल, याचा काय खर्च आहे, याबाबत बीवायडीने स्पष्टीकरण दिलेले नाही.
टेस्ला, बेंझ पिछाडीवर –
टेस्ला कंपनीने उपलब्ध केलेला चार्जर 500 किलो वॅटचा आहे. पंधरा मिनिटात ही कार चार्ज होते आणि 270 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. जर्मनीच्या मर्सिडीज बेंझ समूहाने गेल्या आठवड्यात सीएलए गटातील कार उपलब्ध केल्या असून या कारचे चार्जिंग दहा मिनिटात पूर्ण होते आणि ही कार 325 किलोमीटर अंतरापर्यंत चालू शकते.





