Pune : आयटीआयमध्ये आता पाच नवे अभ्यासक्रम

पुणे – राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवे पाच अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू होत असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपले मंत्रालय आयटीआय संस्थांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी अनेक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून आयटीआय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी औँध आयटीआयमध्ये नवी इमारत बांधली जात आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी नवउद्योजकता आणि कल्पकता धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल लोढा यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोलर, ड्रोन्स, इलेक्ट्रीक गाड्या, थ्री डी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स या क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे सांगितले. या अभ्यासक्रमासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळही संबंधित क्षेत्रातील कंपन्या पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयटीआयमध्ये अधिक मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमांची मागणी केल्यास त्यालाही तात्काळ मंजुरी दिली जाईल असे ते म्हणाले, परिषदेपुर्वी त्यांनी कौशल्य विभागाचे अधिकारी, आयटीआयचे प्राचार्य आणि व्यवस्थापन समितीतील सदस्यांसोबतही बैठक घेतली.
बैठकीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विकास तसेच पायाभूत सुविधांचा पुरवठा, नवीन अभ्याक्रमांसाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीचा पुरवठा, वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी यावर चर्चा झाली. एका प्राचार्याकडे एकाच संस्थेची जबाबदारी असेल यादृष्टीने नव्या भरतीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी दिले.





