देवाच्या कृपेमुळे मी देशाची अर्थमंत्री बनले – निर्मला सीतारामन

कोईम्बतूर – मी देशाची अर्थमंत्री बनेल अशी कधी कल्पनाही केली नव्हती. सर्वश्रेष्ठ अशी काहीतरी अमर्याद शक्ती असल्याचा विसर कधीच पडू देऊ नये, असे मनमोकळे भाष्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले. त्यातून त्यांनी स्वत:च्या वाटचालीचे श्रेय एकप्रकारे ईश्वरी कृपेला दिले.
भाजपच्या नेत्या असणाऱ्या सीतारामन यांनी तामीळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अध्यात्मिक टच असणारी भूमिका मांडली. केवळ ईश्वराची प्रार्थना न करता प्रामाणिक प्रयत्नही करायला हवेत. त्याचवेळी अमर्याद शक्ती पाठिशी असल्याशिवाय उद्दिष्ट गाठता येऊ शकणार नसल्याचेही कधीच विसरता कामा नये.
तुम्हाला ताकद देणारी वैश्विक शक्ती असल्याचे मी स्वत:ला अवघड काळात बजावत असते. तू (ईश्वर) मला इथपर्यंत आणलेस; आता अडथळा ओलांडण्यासाठी मार्ग दाखव अशी प्रार्थना मी करत असते, असे त्या म्हणाल्या. केंद्रात काही मंत्रालये अतिशय महत्वाची मानली जातात. त्यामध्ये अर्थ मंत्रालयाचाही समावेश आहे.





