BWF World Championship 2022 : ‘चिराग-सात्विक’ची ऐतिहासिक कामगिरी

टोकियो – भारताचे स्टार बॅडमिंटनपटू व पुरूष दुहेरीतील दिग्गज मानले जात असलेले खेळाडू सात्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत (BWF World Championships 2022) ऐतिहासिक कामगिरी करताना पदक निश्चित केले आहे.
या (Satwik-Chirag) जोडीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या ताकुरो होकी व युगो कोबायाशी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या भारताच्या या जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. अशाच सरस कामगिरीची पुनरावृत्ती करताना त्यांनी जपानच्या जोडीवर 24-22, 15-21, 21 – 14 असा विजय प्राप्त केला.
अखेरच्या गेमपर्यंत रंगलेला हा सामना तब्बल 1 तास 15 मिनिटे चालला. सात्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग ही जोडी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिलीच पुरुष दुहेरीची (first men’s doubles medal) जोडी ठरली आहे. भारताचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील हे भारताचे दुसरे पदक ठरले आहे.
यापूर्वी महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी 2011 साली भारताला पहिले पदक जिंकून दिले होते. दरम्यान, एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिला यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना महंमद एहसान व हेंद्रा सेतिआवान या जोडीकडून 8-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
प्रणोयचा पराभव
भारताचा बॅडमिंटन स्टार एच. एस. प्रणोय याला अखेर पदकाने हुकलावणी दिली. राष्ट्रकुल स्पर्धा विजेत्या भारताच्याच लक्ष्य सेनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या प्रणोयला चीनच्या झाओ जुन पेंग याच्याकडून पराभव पत्करावा लागला. पेंग याने प्रणोयवर 19-21, 21-6, 21-18 अशी मात केली. पहिली गोम जिंकत प्रणोयने थाटात सुरुवात केली होती. मात्र, नंतरच्या दोन्ही गेममध्ये त्याच्याकडून चुका झाल्या व त्याचे स्पर्धेतील आव्हान संपले.





