Indonesia Open 2024 : भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूची ‘हाराकिरी’ कायम…

BWF Indonesia Open 2024 : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू हिला इंडोनेशिया ओपन बीडब्लूएफ (BWF) सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. महिला एकेरी गटात माजी विश्वविजेत्या सिंधूला चायनीज तैपेईच्या ‘सु वेन-ची’ कडून 15-21, 21-15, 14-21 ने पराभव स्वीकारावा लागला.
सिंधूचा ‘वेन-ची’ विरुद्धचा हा पहिलाच पराभव आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सिंधूला तीन गेमच्या रोमहर्षक स्पर्धेत पराभूत करण्यासाठी ‘सु वेन’ हिला एक तास 10 मिनिटांचा वेळ लागला.
दुसरीकडे महिला दुहेरी गटाच्या पहिल्या फेरीत रितुपर्णा पांडा आणि स्वेतपर्णा पांडा या भारतीय जोडीचा किम सो येओंग आणि कोंग ही योंग या सहाव्या मानांकित कोरियन जोडीकडून 12-21, 9-21 असा पराभव झाला.
सिंधूची हाराकिरी कायम…
पॅरिस ऑलिम्पिक पुढील महिन्यात होणार आहे. त्याआधी सिंधूचा विसंगत फॉर्म चिंतेचा विषय आहे. यापूर्वी सिंधूला सिंगापूर ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये कॅरोलिना मरीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याआधी मलेशिया मास्टर्समध्ये सिंधूचा फॉर्म उत्कृष्ट होता. तिने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत सिंधूला चीनच्या ‘वांग शी यी’ विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय शटलरला तिच्या चिनी प्रतिस्पर्ध्याकडून 21-16, 5-21 आणि 16-21 असा पराभव पत्करावा लागला होता.





