युद्ध समाप्त झाल्याच्या खात्रीमुळे खरेदी वाढली; निर्देशांकात एक टक्का वाढ

मुंबई : इराण आणि इस्त्रायल दरम्यानचे युद्ध समाप्त झाल्याची खात्री पटल्यानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे निर्देशांक जवळजवळ एक टक्क्यांनी वाढले. जागतिक बाजारातूनही याच कारणामुळे सकारात्मक संदेश आल्यामुळे संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी पुढाकार घेतला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 700 अंकांनी वाढून 82,755 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील 2,821 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर 1,207 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 200 अंकांनी म्हणजे 0.80 टक्क्यांनी वाढून 25,244 अंकावर बंद झाला.
बजाज ब्रोकिंग या संस्थेने कामकाजाबाबत सांगितले की, युद्ध समाप्त झाल्याची खात्री पटल्यामुळे आता गुंतवणूकदार खरेदीसाठी पुढे येत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांकांना चांगला आधार मिळाला. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, मुळात भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम होती. मात्र जागतिक नकारात्मक घडामोडीमुळे निर्देशांकावर गेल्या काही महिन्यापासून परिणाम होत होता. आता परदेशातील परिस्थिती सुधारत असल्यामुळे भारतीय निर्देशांक आगामी काळात वेगाने आगेकूच करण्याची जास्त शक्यता आहे.
कालपासून जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येणे चालूच असून दक्षिण कोरिया, जपान, चीन, हाँगकाँग, युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. असे असले तरी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 5,266 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 5,229 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार दिला. आज भांडवली वस्तू व तेल आणि नैसर्गिक वायू पिछाडीवर होते. मात्र इतर सर्व क्षेत्राच्या निर्देशांकात बरीच वाढ झाली असल्याचे दिसून आले.




